अथ शांतीबाईसाच्या ओव्या
देवा महाराजा, येथे यावे आज । वर द्यावे मज, चक्रधरा ॥ १ ॥
प्रसन्न होउनि, वर दिला मज । म्हणौनि गुरुराज, वंदीयला ॥ २ ॥
वस्मत गांवीची, मियाबाई एकी । तिच्या दोघी लेकी, पतिव्रता ॥ ३ ॥
मियाबाई साचा, भ्रातार सरला । पुत्र तोही गेला, काळगती ॥ ४ ॥
एकाइसे तेही, हातरिती जाली । आणून घातली, तियेपासी ॥ ५ ॥
जसमाई बाईसी, काउर लागले । म्हणौनि आव्हेरिले, वरैताने ॥ ६ ॥
कनधन दोन्ही, राजाने हिरतले । तेणे दुःखी जाली, मियाबाई ॥ ७ ॥
गतदुःखास्तव, ग्राम त्येजीयेले । आता नव्हे जाले, राहुनीया ॥ ८ ॥
भलेयाची चाड, अंतरी धरिली । हरिखे वाहिली, तिघी जाऊ ॥ ९ ॥
एक बांधू पाठीसि, एक बांधू पोटासि । जाऊ गोमतीसी, बुडावया ॥ १० ॥
म्हणौनि तिघी जणी, चालल्या तेथौनि । पैठणा येऊनि, विचारतात ॥ ११ ॥
माय म्हणे लेकीसि, ग्रामांत परियेसि । जाऊ भासेयासि, भेटावया ॥ १२ ॥
भासेयाचे नाव, सारंगपंडित । तिघी जाऊ त्वरित, भेटावया ॥ १३ ॥
परस्परे भेटी, जालेयानंतरे । क्षेमाचा उत्तरे, प्रणिपात ॥ १४ ॥
ऐसे हे भोजन, जाले एके दिसी । मागिल वृत्तांत, पांडा पुसे ॥ १५ ॥
मागिल वृत्तांत, अवघा सांगितला । त्याच्या प्रत्या आला, वर्तमान ॥ १६ ॥
मियाबाई म्हणे, आतासी जाईन । आज्ञा लवकरी, द्यावी मज ॥ १७ ॥
तेव्हा त्या बाईचा, हेत लक्षोनीया । द्वारका जावया, आज्ञा दिली ॥ १८ ॥
जर तुम्ही जाता, द्वारके येथोनी । एळापूराहुनी, जावे तुम्ही ॥ १९ ॥
तेथ एक पुरुष, श्रीदेव राऊळ । सामर्थ्य निर्मळ, पहा तुम्ही ॥ २० ॥
ऐसा विनयोग सांगुनी तयासि । तयाच्या शब्दासि, पात्र जाल्या ॥ २१ ॥
तिघी जणी आल्या, एळा त्या पुराला । स्वरूप सुंदरा, भेट जाली ॥ २२ ॥
भेटीचे गोमटे, बहुता परीचे । अनंता सृष्टीचे, दोष नासे ॥ २३ ॥
विहरणाहुनि, आले चक्रपाणि । चतुर्विध दानी, उपविष्ट ॥ २४ ॥
चरणक्षाळण, जालेयानंतरे । पाटसरा आसन, उत्तर गौरा कृष्ण ॥ २५ ॥
तिये अवसरी, आसु फळ काढिले । दृष्टपुत केले, बाबाचिया ॥ २६ ॥
सन्मुख बैसोनि, वेध संचरला । आत्मा निवविला, परमानंदे ॥ २७ ॥
जस्माईबाईचा, जीव होता कष्टी । देवे कृपादृष्टी, सुखी केले ॥ २८ ॥
चरणक्षाळण, बाईसे दिधले । भितरी घेतले, जस्माईसे ॥ २९ ॥
मग त्या बाईला, पुत्र आठवला । गुणाचा चांगला, काय सांगू ॥ ३० ॥
स्वामी म्हणतात, पुत्र आठवला । दुःखास्तव नरका, जाल तुम्ही ॥ ३१ ॥
आता येथोनीया, बीढारासि जावे । सकाळीचि यावे, अवस्वरा ॥ ३२ ॥
प्रातःकाळी आले, चरणा लागले । सन्निधी राहिले, राऊळांच्या ॥ ३३ ॥
बाबा पुसताति, रात्री का आले । तिही सांगितले, नाही बाबा ॥ ३४ ॥
जस्माई बाईचा, रोग नासोनीया । द्वारका जावया, आज्ञा दिली ॥ ३५ ॥
बाई आता तुम्ही, द्वारावती जावे । जस्माईसी न्यावे, सासुरेया ॥ ३६ ॥
मियाबाई म्हणे, हेच द्वारावती । कृष्ण चक्रवर्ती, भेट जाहली ॥ ३७ ॥
आता मी निभ्रांत, जाईना येथोनी । जस्माईल कोणी, नेईल तेथ ॥ ३८ ॥
तेथ प्रिती नाही, नावडी बहुती । घरीची समस्त, प्रतिकुळे ॥ ३९ ॥
श्रीमुखे सांगती, आता हे जाईल । पढियेती होईल, समस्तासि ॥ ४० ॥
तेव्हा त्या कन्येसि, बोले मियाबाई । जस्माईसा नेई, सासुरेया ॥ ४१ ॥
मग एकाइसा, बोले त्या मातेस । मज का धाडीसि, इच्यासंगे ॥ ४२ ॥
तुज सन्निधान, देवाचे आवडे । आम्हा नावडे, जन्मवेही ॥ ४३ ॥
सृष्टीचा नायक, बोले त्या बाईसि । तुमच्या मातेसि, सुख देऊ ॥ ४४ ॥
तोच तुम्हा तेथ, आनंद होईल । असे ते भासैल, अंतःकरणा ॥ ४५ ॥
तेव्हा दोघी जणी, गेल्या तया गावा । उच्छावो बरवा, अतिभावे ॥ ४६ ॥
गावीचे ग्रहस्ता, घरीचे समस्ता । आवडी वरैता, कार्यास्तव ॥ ४७ ॥
ऐसी आवडती, जाली जमाईसे । मग एकाइसे, काय करी ॥ ४८ ॥
एथ शांताबाईसा, सुखानंद दिला । तेथ तोचि जाला, एकाइसा ॥ ४९ ॥
तैसीचि उठली, देव्हाऱ्या बैसली । वेडी पिसी जाली, म्हणताती ॥ ५० ॥
जस्माईचे गेले, एकाइसा आले । अंतर निवाले, अविद्येचे ॥ ५१ ॥
देव्हाऱ्यावरौनी, लवकर उठली । तैसीचि चालली, एळापूरा ॥ ५२ ॥
शांतीबाई सासि, बोले गौरा कृष्ण । एकाइसे तेथौनी, येत असे ॥ ५३ ॥
शांताबाई म्हणे, एकली ते नए । ऐसी विरोधीताए, बाबाजीसि ॥ ५४ ॥
मग जिए दिवशी, एकाइसे येती । ते दिवसी सांगती, पुन्हा पुन्हा ॥ ५५ ॥
माजी लेक रेघ, ओलांडली नाही । आता एत नाही, ऐसे म्हणे ॥ ५६ ॥
तव एकाइसा, एळापुरी आली । सन्मुख देखिली, मातोश्रीनं ॥ ५७ ॥
शांताबाई म्हणे, तू का वो एकली । कोणा संगे आली, माता पुसे ॥ ५८ ॥
ऐसे दटाउनि, बोले त्या लेकीसि । मी उरोधी देवासि, सांजवेही ॥ ५९ ॥
माझ्यासंगे देवो, आला कृष्णरावो । मी एकली का वो, येई येथ ॥ ६० ॥
ऐसी एकाइसे, सन्निधाना आली । दंडवत घाली, देखोवेखी ॥ ६१ ॥
ऐसे हे चरित्र, जाहले एथौनी । दूसरे चिंतूनि, आइकावे ॥ ६२ ॥
बोरी एक झाड, बाबुळी बहुत । सिंपिली त्वरीत, शांताबाई ॥ ६३ ॥
तेव्हा माझा स्वामी, बोले त्या बाईसि । वोलिया वस्त्रासि, नेसा तुम्ही ॥ ६४ ॥
ऐसीही दोनी पक्षे, विधी हा सांगती । स्थावर सिंपवोनी, योग्य जाल्या ॥ ६५ ॥
एथोनी तुमच्या, साताये जन्माचे । चरित जीवाचे, करू आम्ही ॥ ६६ ॥
हे एक वासना, तुळशांची एकी । दुसरे कन्येसि, आस पाहा ॥ ६७ ॥
आता येथोनीया, हेत जस्मा से । उदक तुमचे, घेऊ आम्ही ॥ ६८ ॥
बाई तुम्ही कर्म, सृष्टानुसृष्टी केले । येथोनी नासिले, संतासंत ॥ ६९ ॥
कव्हणी एकी दिवसी, सातनग गांव । तेथीचा अनुभव, दाऊ तुम्हां ॥ ७० ॥
साधा वरदान, ते नाव तुम्हासि । अभय तियेसि, वरदान ॥ ७१ ॥
ऐसे एळापूरी, चरित्र करूनि । तया ते धाडणे, ऋद्धपूरा ॥ ७२ ॥
बाई आता तुम्ही, ऋद्धपूरा जावे । मधी न राहावे, दोन दीस ॥ ७३ ॥
अविद्याची भेटी, घेऊ नका तुम्ही । एक भिक्षा आम्ही, वारीयेली ॥ ७४ ॥
नवेया वस्त्राचा नेम न करावा । मनवा जिंकावा, बहुता परि ॥ ७५ ॥
श्रीप्रभु बाबाचा, प्रसाद घेयावा । बहुत न घ्यावा, विधीयुक्त ॥ ७६ ॥
शांताबाईसाने, मानून घेतले । मग विनविले, स्वामियासि ॥ ७७ ॥
सारंगपंडिती, एथ पाठविले । तयाचेनि झाले, सौख्य मज ॥ ७८ ॥
बाई आता तुम्ही, पैठणासि जावे । तयासि भेटावे, एक वेळ ॥ ७९ ॥
परस्परा तुम्हा, गोमटे भेटीचे । ऐसे निमित्ताचे, ज्ञान केले ॥ ८० ॥
तेव्हा त्या बाईने, आज्ञा मागितली । कन्या निरोविली, एकाई से ॥ ८१ ॥
बाई तुमचीया, संभाळु लेकीसि । मग पैठणासि, गेली तेही ॥ ८२ ॥
जाऊनि भेटली, सारंग पंडिता । पुढिल वेवस्था आइकावी ॥ ८३ ॥
माझ्या घरी तुम्ही, भोजन करावे । आणिक न घ्यावे, भिक्षेचे हे ॥ ८४ ॥
देवे भिक्षा मज, विधी निरुपिला । म्हणौनि भिक्षेला, जावे लागे ॥ ८५ ॥
निषेध पाहूनि, भिक्षा मागितली । पाच घरे विहिली, देहावधी ॥ ८६ ॥
शांताबाई भिक्षा, करोनीया आली । थोडी ते घेतली, भिक्षा त्याची ॥ ८७ ॥
नवीया वस्त्राची, घडी आणियेली । दृष्टपुत केली, पांडेयाने ॥ ८८ ॥
शांताबाई म्हणे, याचे काई काज । नवे वस्त्र मज, वर्जिले ॥ ८९ ॥
तेव्हा अर्ध जुन, वस्त्र आणियेले । मग समर्पिले, प्रार्थुनिया ॥ ९० ॥
भजन पूजन, जालीयानंतरे । आज्ञा द्यावी मज, प्रशस्तीने ॥ ९१ ॥
सारंग पंडित, आज्ञा तया दिली । ऋद्धपूरा गेली, पेणोवेणा ॥ ९२ ॥
तेथ सेवादास्य, श्रीप्रभु बाबांचे । शांताबाई साचे, स्वीकरीले ॥ ९३ ॥
किती एक दिसा, शांताबाई सासि । अशक्ती तियेसि, उपन्नली ॥ ९४ ॥
माय अशक्तीते, सय करी कन्येची । देव तिच्या जीवाची, चिंता करी ॥ ९५ ॥
स्वामी एळापुरी, राज्य करीताति । कन्येसि धाडीति, ऋद्धपूरी ॥ ९६ ॥
बाई तुमचीये, मासि निरोप । धाडिला आम्हीच, मनोधर्मे ॥ ९७ ॥
तेव्हा एकाइसे, ऋद्धपूरा गेली । जावोनी भेटली, मातोश्रीला ॥ ९८ ॥
माय म्हणे लेकीसि, तू का वो आलीसि । स्वामीने मजसि, पाठविले ॥ ९९ ॥
कन्या म्हणे आई, काई रूचे तुज । आज्ञा केली मज, बाबाजीने ॥ १०० ॥
शांताबाई म्हणे, माझा स्वामी मज । तोचि व्हावा आज, ऐसे रूचे ॥ १००१ ॥
पाचा क्षेरी रोग, विभाग देहीचा । जीवा प्रपंचाचा, भेद करी ॥ १०२ ॥
ऐसे हे चरित्र, ऋद्धपूरा जाले । कर्तृमत्व केले, परमेश्वरे ॥ १०३ ॥
मग एकाईसे, करूनि तू ध्यासी । अस्ति पैठणासि, आणियेल्या ॥ १०४ ॥
पीठजये तिए, निंबातळी आसन । स्वामी माझा कृष्ण, अवलोकी ॥ १०५ ॥
एकाईसा आली, दण्डवत घाली । चरणा लागली, अनुतापे ॥ १०६ ॥
सन्निधी बैसली, वार्ता आइकिली । देवे स्विकरिली, कर्णद्वयी ॥ १०७ ॥
ऐसे आइकोनी, मग म्हणितले । तियेसि घडले कर्म, प्रमाणोक्त ॥ १०८ ॥
शांताबाईसाला, केले पारंगत । तैसे मजप्रति न्यावे आता ॥ १०९ ॥
सत्व आठांतुल, त्याचा अवतार । स्वर्गी आहे चंद्र, तेचि नामे ॥ ११० ॥
स्वामी महाराजा, क्षमा जी करावी । आर्त पूरवावी, राघवाची ॥ १११ ॥
स्वामी चक्रधरा, भेटी द्यावी मज । टाकू नका मज, अव्हेरूनि ॥ ११२ ॥
क्षणाक्षणा माये, कृपादृष्टी पाहे । माता बाळ केव्हा, वीसरेना ॥ ११३ ॥
तैसे मी लेकरू, अज्ञान बाळकु । वोवीया कौतुक, संबंधिल्या ॥ ११४ ॥
॥ इति श्रीराघवमुनि रचित ओव्या संपूर्ण ॥
या ओव्यांमध्ये शांताबाईसांच्या वैराग्य प्रवासाचे आणि श्रीचक्रधर स्वामींच्या लीलेचे वर्णन अत्यंत रसाळ भाषेत आले आहे.
