निर्वेद स्तोत्र
॥ श्री निर्वेद स्तोत्र ॥
विज्ञानशक्ती अवतरले : बहुत दैत्य निर्दाळिले :
विश्वरूप प्रकटुनि अर्जुनदेव बोधिले : तया नमन श्रीकृष्णराया ॥ १ ॥
जो चहुयुगीचा अधिष्ठात्री : अमोघा सिद्धी जयाचा घरी :
तो मातापुरी राज्यकरी : तया नमन श्रीदत्तात्रेया ॥ २ ॥
जे अवधूत वेषे क्रीडा करीति : सूपी पुंजे भरुनि गोमतीमध्ये घालीति :
बावना पुरुषा विद्यादान देति : तया नमन श्रीचक्रपाणि ॥ ३ ॥
आत्मारमणी रमती : नगरामध्ये क्रीडा करीति :
कृमीते ब्रह्मपदा नेति : तया नमन श्रीप्रभुराया ॥ ४ ॥
जो शरणागता वज्रपंजरु : आर्ताचा उदारु :
तो नमीन कृपेचा सागरु : श्रीसर्वेश्वरु ॥ ५ ॥
जो भांडारी ब्रह्मविद्येचा : सारथी वैराग्याचा :
बाप आचार्यांचा : नमीन नागार्जुनु ॥ ६ ॥
तया नागार्जुनाचा उपकारु : म्हणौनि महानुभावी जाणितला विचारु :
ए ब्रह्मविद्येचा निर्धारु : नाही आणिके ठायी ॥ ७ ॥
ईश्वरज्ञान निर्धारिता : भूल पडलीसे वेदान्ता :
आणिकाही सिद्धान्ता : ठाउकचि नव्हे ॥ ८ ॥
जे अन्यथाज्ञाने ग्रासिले : अभिलाषे बांधिलेते :
मायाजळी बुडाले : तेथ तृष्णा बहुत ॥ ९ ॥
जेणे अहंकाराचा घोडा वळघला : मानमान्यतेचा अभिलाषु वाढिन्नला :
तो पुरुष आचारे मैळला : तेथ ज्ञानाचा संदेहो ॥ १० ॥
असो, एणेविण काइ राहिले : जे जयाचे हरतले :
ते कव्हणीपरी निर्धारिले : ते विचारू आता ॥ ११ ॥
आचार कीजे मागाडा : निर्वेद बाहिया सवंगडा :
अनुताप रोकडा : उजळता दावी ॥ १२ ॥
निर्वेद कमळिनी विकासु : साधनी नाही अभ्यासु :
तरी झाडेसि करावा सहवासु : निरंतर पै ॥ १३ ॥
जेणे काम क्रोधाते निर्दाळिले : उपाधीते दवर्डिले :
सर्व सुखाते सांडिले : ज्ञानाचेनि बळे ॥ १४ ॥
जयाचे अज्ञान निरसले : अन्यथाज्ञान फिटले :
ज्ञान प्रकाशले : चहु पदार्थांचे ॥ १५ ॥
एक एक पदार्थ विस्तारिता : पर्वत न पुरेचि लिहिता :
आवाका परिसावा जाणता : तोकडेयामाजि ॥ १६ ॥
जेणे ईश्वर धरिलासे मनी : तया सुख नाही साधनी :
अप्राप्ती भावी असन्निधानी : नाश होए कर्मांचा ॥ १७ ॥
जैसे चंद्रेविण चकोरासि : मेघेविण चातकासि :
कांतेविण विरहिणीसि : सुखचि नाही ॥ १८ ॥
ना तरी मायेविण बाळकासि : उदकेविण मीनासि :
तैसे देवेविण भक्तासि : उरणेचि नाही ॥ १९ ॥
जी हे देह उरावयाचे हेचि कारण : जे असन्निधानी झाले श्रवण :
परवस्तुचे सादूषण : थोर होतसे ॥ २० ॥
जरि देतासि आपुलिए भक्तीते : तरि तुजविण माझे देह न उरते :
ज्ञान कोरडे देखते : तेथे प्रयत्न थोर ॥ २१ ॥
जी जी तैचि जर अनुसरता : तरि ए सृष्टीमध्ये न उरता :
साधनेकरुनि साध्य पावता : तुमचिए स्वरूपी ॥ २२ ॥
जी तू सकळ गुणाचा गुणवंतु : मी सकळ दोषांचा दोषवंतु :
तुझा मुरडुनी जाए हातु : निरयाकडे ॥ २३ ॥
ऐसा मी अपराधी ओखटा : तुझा सांडुनी जाए दारवंठा :
यमदूत नेउनि घालीति ताटा : विचंबीति अनेके परी ॥ २४ ॥
ऐसा मी कृतघ्न : तूते जाए सांडुन :
रिणाइत नेति धरून : चहुं वाटा ॥ २५ ॥
जी तू न उबगसि सृष्ट्यानुसृष्टी ज्ञान देता : परि मज वेळ न लगेचि धाडिता :
आता कृपा करीसि की न करीसि ही चिंता : थोर वर्ततसे ॥ २६ ॥
जी मी कव्हणे सृष्टी म्हणितले न करीचि : तूझे हे थोर अनुचित माझे :
आता सेवक म्हणता न लाजे : तरी स्वामीदुऱ्हा तो कव्हण ॥ २७ ॥
जी तू स्नेह करीसि अनादिचे : परि मी सन्निधान न करीचि तुझे :
आता हृदय न फुटेचि माझे : तूंते विनविता ॥ २८ ॥
परि ए सृष्टीमध्ये पाहता : आणिक कोणी नाही रक्षिता :
आपुलाला वेळु घेति देवता : सेवटी दवडुनि घालीति ॥ २९ ॥
तैसा तू नव्हेसि निष्ठुरु : तुझेनि पाडे आणिक नाही उदारु :
जीवाते तारीसि भवसागरु : कृपाळूपणे ॥ ३० ॥
तुझेया श्रीचरणां भजावे : तुजचि शरण रिगावे :
तुझेचि दास्य करावे : जन्मपर्यंत ॥ ३१ ॥
आता माझेया सर्व दोषाते फेडावे : आपुले सेवादास्य द्यावे :
दैवरहाटीमाजी घालावे : अनाथ म्हणौनिया ॥ ३२ ॥
जी मी संसारे त्रसला : म्हणौनि तुज शरण रिगाला :
तुझे वचन जीवेसि धरुनि ठेला : आता ठाके ते करी ॥ ३३ ॥
म्हणति प्रमाणपुरुष : साधनी पाहिजेल सुख :
तरी ये संसारीचे दुःख : नासेल कव्हणेपरी ॥ ३४ ॥
ईश्वराकारणे शरणांगते : परित्यजावे सर्व धर्माते :
मग अप्राप्तीचेया दुःखाते : अर्जावे तेणे ॥ ३५ ॥
ईश्वर स्मरावा चित्ती : जो अव्यक्त आलासे व्यक्ती :
तोचि नेईल प्राप्ती : आनंदस्वरूपाचिया ॥ ३६ ॥
नागार्जुनाचा स्वामी एक वेळ भेटता : तरी जीवेसि धरुनि ठाकता :
केव्हेळाही न सोडता : श्रीचरण तयाचे ॥ ३७ ॥
तरी आता काइ कीजे : हे पंचभौतिक ईश्वरा दीजे :
मग जीवे स्तुति कीजे : देवरायाची ॥ ३८ ॥
जी तू सकळ जीवांची माउली : मनुष्यवेषाची कुपरी साहिली :
ज्ञानशक्ती स्वीकरिली : आर्ता लागी ॥ ३९ ॥
मायावेष धरुनि : उभयशक्ती स्वीकरौनि :
पाहातसे द्यावया लागुनि : चारी दाने ॥ ४० ॥
चरणावरी माथा ठेउनि : विनवित असे : ॥ ४१ ॥
जी औदार्य असे तुमते : तरि क्षणैक पाहावे माझिए आर्तिते :
आणिक काइ असे जीवाते : ते गोसावी जाणति ॥ ४२ ॥
जी तू औदार्याचा रावो : माझिए जीवीचा जाणसि भावो :
आपुलिया श्रीचरणी ठावो : द्यावा मज ॥ ४३ ॥
जी तुझेनि सन्निधानेविण : जिणेया परते निके मरण :
तुझे न देखे श्रीचरण : म्हणौनिया ॥ ४४ ॥
जी तू कुवासा ज्ञानियांचा : सारथी अनुसरलेयांचा :
बाप भक्तांचा : देवा तूचि पै ॥ ४५ ॥
तुझा कृपा कटाक्ष भाव झळकता : तरी प्रेमाचा मोहर लागता :
तिही ठायाचा उच्छेद होता : एराची चिंता तुजचि की ॥ ४६ ॥
काइ मी मशक विनवीन : कवणे परी ईश्वराते तोषवीन :
काइसेन पूजा करीन : माते काहीच नाही ॥ ४७ ॥
आता अनुतापाचे आसन रचावे : अश्रुपाती चरण क्षाळण करावे :
मग स्वामीते विनवावे : पूजेलागी ॥ ४८ ॥
कर्मत्यागे झाडावे : विकल्पे सारवावे :
काम क्रोधाचे चूर्ण करावे : मग भराविया रंगमाळिका ॥ ४९ ॥
तप चंदनाचा रेखुनि टीळा : मन-मोगरीया परिमळा :
आवडीचिया कंठीमाळा : ओळगवाविया ॥ ५० ॥
धुपटना देहाचा : अंगारा विरहाग्नीचा :
धूप ज्ञानेंद्रियांचा : उधळावा ॥ ५१ ॥
भाव कनकाचा परिएळी : जीव-रत्न- दीप उजळी :
मग आरती ओवाळी : श्रीसर्वेश्वराते ॥ ५२ ॥
विकार कुरवंडी करुनि सांडावा : अनुसरणाचा वीडा ओळगावा :
मग निर्वेद मंत्र म्हणावा : प्रतिदिनी ॥ ५३ ॥
आचार कनकांच्या परिएळी : स्मरणाचा ओगर ओगरी :
तुलेनि स्वीकरी सर्वेश्वरु : स्वामी माझा ॥ ५४ ॥
थोडाचि निर्वेद म्हणितला : तो श्रोता महानुभावी ऐकिला :
तेणे संसार सांडिला : हरळाचिए परी ॥ ५५ ॥
ऐसा निर्वेद करीता : जीवासि होए चोखाळता :
प्रतिदिनी अनुष्ठिलीया होए योग्यता : वीतरागासि ॥ ५६ ॥
महानुभावी निरुपिले : तेथचे कणुकणु काढिले :
मग नागार्जुनाचेया स्वामीते विनविले : पूजेलागी ॥ ५७ ॥
महानुभावी निरुपिता : ऐसेचि आले माझेया चित्ता :
निमित्तविधी होए योग्यता : आचरणेन ॥ ५८ ॥
परी हे देह माझे न करीचि म्हणितले : वरि अनधिकारे असे जिंतिले :
महानुभावाचिए भेटी नावेक सत्व उपनले : तयाचा जिव्हाळा मज ॥ ५९ ॥
दिवस जातसे रजे राभस्ये वेगी : रात्र जातसे निद्रा प्रसंगी :
गुरुकुळाची सेवा न घडेचि सत्संगी : आता योग्यता ते कैची ॥ ६० ॥
जरि स्तुति करू म्हणे : तरि मागा महात्मे पढिन्नले पुराणे :
तेथ माझे शोच्याचे विनवणे : काइसे तुजपुढे ॥ ६१ ॥
जी मी असन्निधानी जन्मला : तुज मायबापेविण निढाळ ठेला :
वरि सांडुनि दिला : निराधार देवा ॥ ६२ ॥
जी मी तुझेया आचाराची नेणेचि निगुती : आता जीउनि अनिष्ट जोडू किती :
तुझेया भक्ता उपजली खंती : तेणे तू उदास मजसि ॥ ६३ ॥
जळो जळो हे जियाले : तुज ईश्वरेविण हे देह उरले :
मिया नाही मोकलिले : तयाचे कार्य हे ॥ ६४ ॥
म्हणौनि आपुला निर्वेद करीन : तुझे श्रीचरण हृदयी दृढ धरीन :
नावेक परते ठेवीन : मनोधर्म हे ॥ ६५ ॥
तुज अनुसरले : ते काइ जीवधर्म भोगावया उरले :
तेही मेलेयाचे अंगिकरले : तेथ कखावो कैचा पै ॥ ६६ ॥
जी हे वरवडे तुज दिधले : अन्तर मागा ठेविले :
म्हणौनि हे देह उरले : अनिष्टालागी ॥ ६७ ॥
जरी वेच असता तुझा ठाइ : तरी मनोधर्माची नुरती राई :
जळता दिसती खाई : या इंद्रियांची ॥ ६८ ॥
रजातमाचा होत असे वळसा : (मनोधर्म तमाचा भवतसे वळसा) :
तेथ तू हृदयी येशील कैसा : म्हणौनि तो काळ लेखी लागेल ऐसा भरवसा करू न ये ॥ ६९ ॥
म्हणौनि विषयाचा विटाळु लागू नेदावा : हा मनवा कवणीकडे जाऊ नेदावा :
बहूत वेच तुझे ठाई होआवा : तै तू हृदया येसी ॥ ७० ॥
जी तू अगाधाचा अगाधु : तुझा सनकादिका लागला वेधु :
गोपी भक्ता तुझा छंदु : तैसा देयावा मज ॥ ७१ ॥
जी नेणे तुझे चरित्र कैसे : तुवा जळचरे वेधिली परेशें :
तैसे तुझे लागो का पीसे : रात्रंदिवस ॥ ७२ ॥
ते गौरवर्ण श्रीमूर्ती जरी देखता : तरी हा आत्मा भेटीसी करीता :
त्रिविधा तापापासौनि सुखिया होता : तुझा श्रीचरणी ॥ ७३ ॥
जी तू माझी माउली विसावा : आणि सकळाही जीवा :
घरोघरी करी धावा : भक्तालागी ॥ ७४ ॥
काय वाणू ते उत्तर दिशा : तेथ निफज झाला वस्तुचा कैसा :
म्हणौनि सिधे सांडूनि धाविन्नला कैसा : आर्तालागी ॥ ७५ ॥
सदैव ते उत्तर दिशा : कवण वोवसली वोवसा :
तेथे वरिसावो जाला कैसा : प्रेमाचा ॥ ७६ ॥
ना ते उत्तर दिशा सासिन्नली : सुवर्णफुले फुलली :
म्हणौनि आदिनाथे अंगिकारली : भाग्यवंत ॥ ७७ ॥
की रत्ने माणिके मोतिए निफन्नली : प्राकृता ग्राहिका न घेववली :
मग जाणतेन राये घेतली : उदारपणे ॥ ७८ ॥
ना ते उत्तर दिशा सौभाग्यवंत : म्हणौनि आवडी असे तया देशांत :
तेथचे असति आर्तवंत : म्हणौनि येणे नाही ॥ ७९ ॥
ऐसा मी अजुनि जिते : कवणी सृष्टी जीवे न धरीचि तुते :
म्हणौनि निर्जनी सांडिले माते : अमंगळ म्हणौनि ॥ ८० ॥
आवो उत्तर दिशे बाइको : तेथ माझी माउली आली असे पाइको :
ते कवणे परि डोळा देखो : ऐसा रात्रंदिस सोचित असे ॥ ८१ ॥
तिए उत्तर दिशेचा मार्ग लागे : तरि ऐसे दैव जोडिले नाही मागे :
ऐसाही जावो म्हणे वेगे : तरी आज्ञा नाही ॥ ८२ ॥
जी मी ज्ञानाचा दुष्काळी जन्मला : तुज मायबापेविण निढाळ ठेला :
वरी अविद्येचा सुना ओढिला : चहुकडे ॥ ८३ ॥
ऐसा मी टुकटुकीत असे : आता कवणीपरी जिणे कैसे :
हे तुवा सांगावे परेशे : भलतेयापरी ॥ ८४ ॥
आणिक एक विनवितो सायासी : तुझेया भक्तावरी ओखटी बुद्धी मानसी :
तेयाचेनि दुखविलेया तू दुखवसी : मग मी के रिगैन ॥ ८५ ॥
जी तू पांडवांचा वेळाइतु : दुर्वास भोजन मागो आला त्वरितु :
तै द्रौपदीच्या धावण्या धावतु : बहुते वेगेसि ॥ ८६ ॥
शिशुपाळ निंदा करीता : बहुत उपसाहिले गोपीनाथा :
शें भरी सविया देता : शिरच्छेद केला पै ॥ ८७ ॥
म्हणौनि संतांची निंदा करीता : कव्हणी नाही झाला जाणता :
अठरा ब्रह्महत्या घडिलीया सांगता : जन्मेजयासि ॥ ८८ ॥
म्हणौनि संतांची निंदा करीत : तयाचिया कुळा क्षयो होय त्वरित :
पाठी काय करीति यमदूत : ते जाणवेचि ना ॥ ८९ ॥
चौऱ्यांशी नरक सांगितले : आणिक बहुत असति उरले :
ते नाही विस्तारिले : जे कानी आइकवतीना ॥ ९० ॥
खैरा इंगळावरी चालविता : थोर दुःख होए पाय जळता :
ऐसे यमदूत जाचिता : कव्हणी पुरे न म्हणे ॥ ९१ ॥
तापलेया तांब्रपत्रावरी चालविता : जीव न वचे देह जळता :
तेणे दुःखे चडफडिता : परि यमदूत कठीण ते ॥ ९२ ॥
मग नेति असिपत्राचिए वाटे : तयाची पत्रे खांडेयापसि तिखटे :
तयावरी घालिता देह तुटे : ते दुःख काय सांगो ॥ ९३ ॥
मग नेउनि कुंभिपाकी घालीति : वरी चांग झाकण ठेवीति :
भितरी खतपता कढति : त्या दुःखा अंतु नाही ॥ ९४ ॥
हे देशवळ नरक जाणावे : ययाहूनि नित्य थोर परिसावे :
म्हणौनि बरवेया परी संत अर्जावे : भलतेनि ॥ ९५ ॥
हे नरक मिया आइकिले : तव पोटी पाय रिगाले :
ऐसे बहुत असति अर्जिले : आता निस्तरैन कव्हणी परी ॥ ९६ ॥
जे रक्ष रक्ष माते : थोरे काकुलती विनवितो तूते :
पाहो नको माझेया अपकाराते : तू माउली माझी ॥ ९७ ॥
जी तू कृपेचा सागरु : आर्ताचा उदारु :
जीवासि तारिता भवसागरु : हे सहज गुण तुझे ॥ ९८ ॥
जी तुज अखंड जिवाची चिंता : हे वचन आइकिले ताता :
तरी माते वेगळे न करावे कृपावंता : देवदेवा ॥ ९९ ॥
जी अखंड तुमते आशंसिता : तुम्ही न कराल माझी चिंता :
तरी प्रेमासि पात्र नव्हता : तूचि करुनि दावसी की ॥ १०० ॥
जी तुमते उद्धरावयाचे व्यसन असे : तरी माते लावावे भक्तीचिए कासे :
आपुले प्रेम देउनि विश्वासे : ब्रिदे साच करावी ॥ १०१ ॥
जी असन्निधान दुरौनि दिधले : म्हणौनि स्वीकरिसी ना माझे विनविले :
कव्हणी सृष्टी नाही जोडिले : तेणे तू उदास मजसि ॥ १०२ ॥
जी परिसाना माझी विनंती : वास न पहाल माझिये येउति :
तरी कैवल्यदानी ऐसी ब्रिदे म्हणौनि जाल केउति : मिया जीवेसि धरिले असे ॥ १०३ ॥
संसार सोडविता ऐसी आइकिली कीर्ति : तुम्हा शरण आलो मी निश्चिती :
तरी माझे सत्व पहाल किती : शोच्या जीवाचे ॥ १०४ ॥
महानुभावांचा आचार कानी आइकिला : एकाचा प्रत्यक्ष डोळा देखिला :
म्हणौनि तया सोइ लागला : अनुष्ठावया ॥ १०५ ॥
गरुडा तिही लोकी गमन : एरी पक्षी काइ न करावे उत्पवन :
तैसे आचाराचे अनुसंधान : न सांडावे तापसी ॥ १०६ ॥
जय जय अच्युता अव्यक्ता : जय जय निर्गुणा गुणवंता :
जय जय बोधदायका व्यक्तमंता : तुज नमन असो ॥ १०७ ॥
नमन तुझेया ज्ञानिया भक्ता : त्यागिया शरणांगता :
तापसा विरक्ता : मुख्य करुनिया ॥ १०८ ॥
जयासि विषयाचा विटाळु न लगे : अभिलाष जयाचिए सेजे नरिगे :
जेही काम क्रोध वाटुनि घातले गंगे : तया तापसा नमन माझे ॥ १०९ ॥
जेही सर्वस्व सांडिले : आपले जन्म ईश्वरा दिधले :
जयाचा हृदयी अवस्थान केले : तया बोधवंता नमन माझे ॥ ११० ॥
तो बोधवंत कैसेनि ओळखिजे : अन्यथाज्ञान न ये जयाचिए वाचे :
तो वा काले स्मरणाचे : आणिक काइसेया नातळे ॥ १११ ॥
तो सकळापासौनि निवर्तला : आन काइसेया नाही उरला :
तो ईश्वरी असे वेचला : रात्रंदिवसु ॥ ११२ ॥
शास्त्र श्रुति स्मृति : गुरुकुळेसि असे प्रिती :
तयासि देवाची आर्ती : अखंडित पै ॥ ११३ ॥
जेणे अभिलाष जिंतिला : राग द्वेषाते पहुड घातला :
कामक्रोध पाटा वाटला : ज्ञानाचेनि बळे ॥ ११४ ॥
संसार ठोकरी हाणितला : तव काळे हात झाडिला :
देवे श्रीकरी घेतला : शरणांगत म्हणौनिया ॥ ११५ ॥
तो संसारासि रुसला : म्हणौनि सकळाही वंद्य जाहला :
अपरोक्षज्ञानिये माथा तुकिला : तयाचा आचार देखोनिया ॥ ११६ ॥
तेयासि इंद्रादिक आपुले परावे जाले : ब्रह्मादिक दांत चाउनि राहिले :
माया आपुलेपणे खेळविले : विशेषवेही ॥ ११७ ॥
तयासि ईश्वरसन्निधानाची घरटी : ब्रह्मादिक धावति पाठोपाठी :
चारी दाने देउनि सेवटी : ईश्वरस्वरूपी मेळवीति ॥ ११८ ॥
तया ज्ञानियाचेनि दर्शने : पापा होति पुरश्चरणे :
तयाचा अव्हेर न करावा कव्हणे : भलतेनि वंदावे ॥ ११९ ॥
जी मज नाही कव्हणाचा आधारु : वरि काळ जात असे दुर्धरु :
रात्रंदिवस लोटावया काय करू : तू अखंड आठवीसि ना ॥ १२० ॥
म्हणौनि ऐसेया परी आपुला काळ क्रमी : दिवस जावो नेदी मनोधर्मी :
ऐसे विचारावे तुम्ही : या दो माजी कव्हण चांग ॥ १२१ ॥
नागार्जुनाचा स्वामी स्मरता : जीवाची बंधने तुटली आचरता :
योग्य जालेया होए सायुज्यता : परब्रह्मेसि ॥ १२२ ॥
लटिके तमणे : अपयश करणे :
अभिलाषा येउते मने : योगीया जावो नेदी ॥ १२३ ॥
अचळ मुरारी अनुष्ठिता : अविधि रिगावा नाही पाहाता :
आचारी होए दक्षता : निरुपम ॥ १२४ ॥
दामुनि निर्वेद म्हणितला : तो महात्मजनी आइकिला :
जैसे मायबाप तोख
ति बाळकाचिया बोला : धाकुटे म्हणौनिया ॥ १२५ ॥
॥ इति निर्वेद स्तोत्र संपूर्ण
